औरंगाबाद : सातारा-देवळाई मनपा वाढीव क्षेत्राच्या दोन जागांसाठी वॉर्ड क्रमांक ११४ आणि वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. मत द्या... पाणी येईल नळाला, एकच ध्यास वॉर्डाचा विकास, आपला माणूस, सुरक्षा, विकासाला साथ, सुशिक्षित व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांना विजयी करा, अशा घोषणायुद्धाने सातारा-देवळाई परिसर दुमदुमला आहे. वॉर्ड क्र. ११४ शिवसेनेचे हरिभाऊ हिवाळे, वॉर्ड क्र. ११५ पल्लवी गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. पालकमंत्री रामदास कदम व चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारांच्या समर्थनार्थ विरोधी पार्टी व मित्रपक्षांचा समाचार घेत मताधिक्य वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही वॉर्डांची जबाबदारी दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांवर टाकण्यात आलेली आहे, तर वॉर्ड क्र. ११४ काँग्रेसचे उमेदवार राजू नरवडे, वॉर्ड क्र. ११५ मधून सायली जमादार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार, माजी आ. नामदेव पवार यांनी केले. सातारा-देवळाईतील पटेल मतांची मोट बांधण्यात एकवटले आहेत. वॉर्ड क्र. ११५ मधील भाजप उमेदवार सुरेखा बाविस्कर, ११४ मधील उमेदवार अप्पासाहेब हिवाळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आ. किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. वॉर्ड ११४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नामदेव बाजड यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते साधेपणाने केले.बदलत्या काळानुसार पद्धत बदलली असून, एका क्लीकवर मतदाराचे नाव व त्याच्या कुटुंबाची माहिती अपडेट होत आहे.
सातारा-देवळाई निवडणुकीत ‘ध्वनियुद्ध’ रंगात
By admin | Updated: April 7, 2016 01:05 IST