साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा - देवळाई परिसराचा विकास नगर परिषद अस्तित्वात आल्याशिवाय होणार नाही, अशी स्थानिक रहिवाशांची भावना आहे; परंतु ही नगर परिषद कधी दिसणार असा प्रश्न ते विचारत आहेत. स्थानिक रहिवासी व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडे अनेक वेळा संपर्क साधला; परंतु पुढे काही होत नाही. रेंगाळलेली विकासकामे नगर परिषद आल्यावरच होतील का अशी त्यांची विचारणा आहे. आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपद तांत्रिक खोड्यात काही महिने अडकले होते. त्यामुळे निधीचा वापर झाला नव्हता. आता निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगितले जाते. ही आचारसंहिता संपताच पदवीधर मतदारसंघ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. २०१५ मध्ये तरी नगर परिषद अस्तित्वात येते की नाही, अशी शंका सातारा -देवळाई परिसरातील नागरिकांना आहे. नगर परिषद होईल, असे समजून परिसरात बांधकामांना वेग आला आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नगर परिषद येईल तेव्हा येईल; परंतु सफाई, पाणीटंचाई, वीज आदी प्रश्न सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. लेखी तक्रार देऊनही पदाधिकारी व अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. सातारा-देवळाई परिसराचा विस्तार पाहता ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर स्थिती गेल्याचे दिसते. येथील रस्ते, पाणी, विद्युत दिवे, दैनंदिन सेवा देण्यासाठी अतिशय मोजकेच कर्मचारी असल्यामुळे आणखी किती दिवस सातारावासीयांना झगडावे लागेल, असा प्रश्न सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मधुकर लंगडे यांनी विचारला आहे. कर्मचारी, अधिकारी, नोकरदारवर्ग या भागात वास्तव्यास आला असून, जागा घेऊन हक्काचे घर उभारण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. वर्षभरापूर्वीची घोषणा या भागात बँका, शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय असून उत्तम दर्जाची म्हणता येईल अशी एकही सेवासुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही, म्हणून शासनाने सातारा-देवळाई परिसराला नगर परिषदेचा दर्जा देण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. त्यामुळे रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी घोषणेची पूर्तता झालेली नाही. रस्ते, पाणी, वीजपुरवठा, ड्रेनेज इत्यादी सेवासुविधा अद्यापही खूप लांब आहेत. नगर परिषद येऊन सर्व काही शहराच्या तुलनेत होणार या विचारानेच रहिवासी खुश आहेत; परंतु अनेक अडचणी येत असल्याने त्यांच्या आनंदावर पाणी पडत आहे. अनेक कामे जवळपास ठप्प झाली आहेत. आणखी किती दिवस नगर परिषदेची वाट बघावी लागेल, असा प्रश्न सातारा विकास मंचच्या सविता कुलकर्णी, प्रा. स्मिता अवचार, प्रा. भारती भांडे, अनंत सोन्नेकर यांनी विचारला आहे.
सातारा-देवळाई न.प.चे गाजर किती दिवस ?
By admin | Updated: May 9, 2014 00:10 IST