उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. अशाच पद्धतीने सरपंचाची निवड करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, याबाबत एका समितीही गठित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के नागरिकांनी होय शासनाने सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. थेट निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीतही राबविल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी राज्य शासनाने नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच नगराध्यक्षाला अधिकचे अधिकार देऊन या पदाला महत्त्वही मिळवून दिले. शहरी भागातील बहुतांश नागरिकांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागतच केले होते. आता सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचे विचाराधीन आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एका समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, शासनाच्या या भूमिकेबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाच्या थेट जनतेतून होणाऱ्या निवडीला आपली पसंती दर्शविली आहे, तर १८ टक्के नागरिकांना अद्यापही ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड व्हावी असे वाटते. लोकमतने या विषयासंदर्भात ग्रामस्थांची मत-मतांतरे सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे जाणून घेतली.सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास काय परिणाम होईल असा प्रश्न ग्रामस्थांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असे मत नोंदविले आहे. २७ टक्के ग्रामस्थांना अशा पद्धतीने सरपंचाची निवड झाल्यास सक्षम तसेच जनतेच्या मनातील व्यक्तीला या पदावर बसण्याची संधी मिळेल असे वाटते, तर २१ टक्के नागरिकांना सरपंचाची निवड थेट जनतेतून झाल्यास निवडणुकीदरम्यान होणारी सदस्यांची पळवापळवी थांबेल असा विश्वास वाटतो. काही ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करतानाच नगराध्यक्षाप्रमाणेच सरपंचालाही अधिकचे अधिकार देऊन हे पद अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून, अशा पद्धतीची कार्यपद्धती सरपंच निवडीवेळी राबविल्यास ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मतद होईल, असा विश्वास ११ टक्के ग्रामस्थांना वाटतो आहे. (प्रतिनिधी)
थेट जनतेतूनच व्हावी सरपंचाची निवड
By admin | Updated: December 31, 2016 00:16 IST