या योजनेंतर्गत गंगापूर तालुक्यातील धामोरी खुर्द येथे सरपंच शोभाबाई लांडगे, उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी ५५ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. गावात जवळपास ३०० कुटुंबे असून रोज ५५ ते ६० कुटुंबांना भेटी देण्यात येऊन प्रत्येक कुटुंबास विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आवाहन सरपंच, उपसरपंचांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी सदस्य पंढरीनाथ चव्हाण, गणेश कोकरे, गजराबाई धनुरे, अनिता पवार, भूषण रणयेवले, ग्रामसेविका रामेश्वरी दळवी, तलाठी डी. आर. दुसिंगे, कृषी सहायक कृष्णा गायकवाड, पालवे, पोलीस पाटील सुधाकर रणयेवले, अंगणवाडी व आशा सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
कर भरण्यासाठीही करीत आहेत आवाहन
‘सरपंच आपल्या दारी’ या उपक्रमात नागरिकांना शासनाच्या ‘पोकरा योजना’, पीक कर्जाबाबतच्या अडचणी, संजय गांधी-श्रावण बाळ योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड कसे काढावे, घरकुल, महिला बचत गटासाठी योजना, कोविड लसीकरणाबाबत जनजागृती केली जात असून या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी अरित फाउंडेशनचे स्वयंसेवक संचिका भरून घेत आहेत. यासोबत ग्रामपंचायत मालमत्ता कर तसेच नळपट्टी भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे.