बीड: टाईमपास, आशिकी २ या मराठी, हिंदी चित्रपटातील गितांसह मराठमोळ्या लावण्यांवर लोकमत सखीमंचच्या सदस्यांनी बहारदार नृत्य केले. सदस्यांची गर्दी, टाळ्या आणि गायकांचा सुरेल आवाजाने नाट्यगृहाचा परिसर गजबजून गेला होता.‘लोकमत सखी मंच’च्या वतीने खास महिलांच्या आग्रहास्तव संदीप काळे निर्मित व अनघा काळे प्रस्तुत ‘सरीवर सरी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सायंकाळी हजारो सदस्यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरूवातीपासूनच संदीप काळे, अनघा काळे, रवी खोमणे, कविता तायडे यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थित हजारो सखीमंचच्या सदस्यांची मने जिंकली. ‘मोरया मोरया ..’ या मराठी गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर ‘मन उधाण वाऱ्याचे...’ गीत गायले. हे गीत उपस्थित सखींच्या ह्रदयाला छेदून गेले. सखींनी टाळ्या व हात डोलावून या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सुरूवातीला मराठी गीते गाणारे गायकांनी नंतर आपली वाटचाल हिंदी चित्रपटातील गीतांकडे वळविली. यालाही महिलांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशिकी २ या हिंदी चित्रपटातील ‘हम तेरे बीन अब रह नही सकते...’ या गाण्यांचा म्युझिक कानावर पडताच मंचच्या काही सदस्यांनी शिट्ट्यां मारायला सुरूवात केली. शिट्यांचा व टाळ्यांच्या आवाजाने नाट्यगृह गजबजून गेले होते. महिलांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहताच गायकांनीही आपला उत्साह वाढविला. मराठी, हिंदी गाण्यांची फेरी संपल्यानंतर सुरू झाल्या त्या बहारदार मराठमोळ्या लावण्या. ढोलकीचा ताल.. गायकांची चाल आणि सदस्यांची बहारदार धमाल... अशीच काहीशी परिस्थिती लावण्या सुरू असताना पहावयास मिळाली.चांदणं चांदणं झाली रात, रेशमाच्या रेघांनी..., आई भवाणी तुझ्या कृपेने..., नदीच्या पल्ल्याड...रिक्षावाला... आदी बहारदार गितांसह नुकतेच प्रदर्शित झालेल्या फॅन्ड्री मधील तुझ्या प्रीतीचा इंचू मला चावला तर टाईमपास या मराठी चित्रपटांमधील मला वेड लागले प्रेमाचे... आणि ही साजूक पोली तुपातली, हिला... या गितांवर तर मंचच्या काही सदस्यांनी स्टेजवर तर काहींनी आपल्या जागेवरच मनमोकळा डान्स केला. या कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्स हे होते. यावेळी राजेंद्र तायडे, कविता तायडे, गौरव पवार, महेश जाधव, स्वप्नील वैद्य, कार्यक्रमाच्या प्रायोजक कल्पना डहाळे, संगीता कोठारी, मनीषा जायभाये, प्रतिभा तांबट यांच्यासह सखीमंचच्या सदस्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला वनवे यांनी केले. (प्रतिनिधी)आपकी फर्माईश बताओ...कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गायकांनी सखी मंचच्या सदस्यांना आपकी फर्माईश बतोओ.. असे आवाहन करताच महिलांनी आपल्या फर्माईशच्या चिट्ट्यांची रीघच लावली. सदस्यांच्या फर्माईशनुसार एकापेक्षा एक बहारदार गाणे गायकांनी गाऊन महिलांचे मनोरंजन केले.
बीडमध्ये ‘सरीवर सरी’ कार्यक्रमात सखी मंचच्या सदस्यांची धमाल
By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST