औरंगाबाद : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी १६ जानेवारी रोजी उद्घाटन केलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावरील सायकल ट्रॅकला शिवसेना आ. संजय शिरसाट यांनीच विरोध केला असून, या ट्रॅकमुळे वाहतूक आणि व्यवसायांचा फज्जा उडत असल्याचे सांगत विरोधी ‘ट्रॅक’वर चालण्यास सुरुवात केली आहे.
शहरात सुवर्णपथ योजनेतून क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता सुमारे ३५ कोटी रुपयांतून बांधण्यात आला. वाहतुकीच्या दृष्टीने हा एकच रस्ता शहरात सुरक्षित होता. मात्र, आता तेथेही सायकल ट्रॅक आणल्यामुळे व्यावसायिकांंना आणि विशेषकरून चारचाकी वाहनधारकांना हा रस्ता अडचणीचा ठरू लागला आहे. व्यावसायिकांच्या मनात असलेल्या खदखदीला आ. शिरसाट यांनी विरोधाची भूमिका घेऊन वाट मोकळी करून दिली आहे.
पर्यटनमंत्री ठाकरे १६ जानेवारी रोजी शहरात येण्यापूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे सायकल ट्रॅकमुळे त्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे आणि वाहतुकीचे कसे नुकसान होऊ शकते, हे समजावून सांगितल्याची माहिती आहे. शिवाय जेथून ट्रॅक गेला आहे, त्याखालून ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे, अशी माहितीही देण्यात आली होती. हे सर्व समोर असताना पालिका प्रशासन तेथे सायकल ट्रॅकची संकल्पना का राबवत आहे, असा प्रश्न काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला होता. आ. शिरसाट यांनी देखील पालकमंत्र्यांच्या कानावर ही बाब टाकली होती.
हा ट्रॅक चुकीचा आहे. यातून पुढे त्रास होणार आहे. मात्र, सायकल ट्रॅकच्या उद्घाटन कार्यक्रमाची पत्रिका तयार झाल्यामुळे त्या दिवशी काही करता आले नाही, असे सांगत आ. शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
चौकट...
दिवसातून दहा सायकलीही जात नाहीत
यासंदर्भात आ. शिरसाट म्हणाले, त्या सायकल ट्रॅकमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याऐवजी अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत सोमवारी पालिका प्रशासक यांना पत्र देणार आहे. संबंधित ट्रॅकमधून दिवसभरात दहा सायकलीही जात नाहीत. रस्ता अरुंद झाला आहे. चारचाकी वाहनांची पार्किंग रस्त्यावर येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी रुंदीकरणात जागा दिली, त्यांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासकांच्या मनात आले आणि त्यांनी केले; परंतु त्याचा त्रास सर्वांना होऊ लागला आहे. त्यामुळे हा ट्रॅक तातडीने काढून घेतला पाहिजे.
- आ. संजय शिरसाट