उस्मानाबाद : संजय प्रकाश निंबाळकर यांनी दिलेला पक्षाच्या सक्रिय सदस्यत्त्वाचा राजीनामा प्रदेश भाजपाने स्वीकृत केला असून, पक्ष विस्तारात अडचणी निर्माण करणे व पक्षशिस्त भंग करण्याचा ठपका ठेवत निंबाळकर यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द करीत त्यांना भाजपामधून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले आहे. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला विरोध करीत संजय निंबाळकर यांनी तडकाफडकी प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्षांना पक्षाच्या सक्रीय सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठविला होता. हा राजीनामा पक्षाने स्वीकृत केला असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी कळविले असून, निंबाळकर यांनी आपली भूमिका पक्षाकडे मांडण्याऐवजी प्रसारमाध्यमात मांडून पक्षाची बदनामी करणे, पक्षाशिवाय वेगळा समांतर कार्यक्रम राबविणे, बैठका करणे, पक्ष विस्तारास अडचण करणे तसेच पक्ष शिस्तभंग करणे आदी कारणांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशावरून निंबाळकर यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात येत असल्याचेही सांगितले आहे. निंबाळकर हे भाजपामध्ये मागील अनेक वर्षांपासून कार्यरत होते. जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. याबरोबरच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून ते भाजपाचे उमेदवार होते.
संजय निंबाळकर यांचे भाजपा सदस्यत्त्व रद्द
By admin | Updated: February 9, 2016 00:25 IST