लातूर : लातूर तालुक्यातील काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेवर ‘तिच्या’ मृत्यूचे सावट आहे. या शाळेतील दोन शिक्षकांवर बलात्कारानंतर खुनाचा गुन्हा दाखल होताच आश्रमशाळेला शासकीय अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी भेटी देण्याच्या घटना अचानक वाढल्या. गुरुवारी शाळेवर सकाळपासून तब्बल आठ पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. तर समाजकल्याणसह विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीने आश्रमशाळा दिवसभर व्यस्त राहिली. बुधवारी सकाळी काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेच्या एका मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचा मृत्यू बलात्कारानंतर झाल्याचा आरोप करून फेर शवविच्छेदनाची मागणी केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. अखेर दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. गुरुवारी सानेगुरुजी आश्रमशाळेवर दिवसभर विविध मान्यवरांची रिघ लागली होती. प्रादेशिक समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी सायंकाळी स्वत: शाळेवर जाऊन भेट दिली. मुलांशी चर्चा केली. याशिवाय, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आश्रमशाळेवर दिवसभर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये पीएसआय घोडके, पीएसआय दामटे, हेकॉ. राख, भोसले, थडकर व कुरे आणि सोनवणे अशा सात पोलिसांचा फौजफाटा दिवसभर आश्रमशाळेवर होता. त्यामुळे शाळेला जवळ जवळ छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी) काटगावमधील या सानेगुरुजी आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापकासह एकूण ९ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. मुख्याध्यापक एस.डी. चव्हाण हेच संस्थापक आहेत. काटगाव गावानजीक असलेल्या पेट्रोलपंपाच्या पुढे आश्रमशाळेची भव्य इमारत असून, ‘डब्ल्यू’ आकारात बांधल्या जात असलेल्या या आश्रमशाळेचे अद्ययावत दोन मजले तयार आहेत. तर तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे साहित्य आवारात पडले आहे. आश्रमशाळेच्या इमारतीतच दोन खोल्या मुलांसाठी, तर दोन खोल्या मुलींसाठी राखीव असून, तिथेच मुले-मुली राहतात. ४भोजन करण्यासाठी मुलांना रस्ता ओलांडून पलिकडे भोजन कक्षात जावे लागते. तिथे वसतिगृह अधीक्षकाचे निवासस्थान आहे. ते कुटुंबासह तिथेच राहतात. दररोज रात्री १० पर्यंत शिकवणी वर्ग होतात.