गंगापूर : तालुक्यातील सिरजगाव परिसरातून वाहणाऱ्या शिवना नदीतून वाळू तस्करी करणाऱ्या टॅ्रक्टर-ट्रॉली व मोटारसायकलीस अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री (दि.१३)आग लावली. यात मोटारसायकल भस्मसात झाली, तर टॅ्रक्टरचे मोठे नुकसान झाले. गेले अनेक दिवस नदीपात्रातून रात्री वाळू चोरी सुरू होती. त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप काहीही नोंद घेण्यात आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार सिरजगावजवळून वाहणाऱ्या शिवना नदीवर गावाच्या पश्चिमेस कोल्हापुरी बंधारा आहे. त्याचप्रमाणे पूर्वेस बोलेगाव या ठिकाणीदेखील एक बंधारा आहे. या परिसरातून वाळू तस्करी करण्यास सिरजगाव येथील ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे या परिसरातून चोरून-लपून वाळू वाहतूक के ली जात होती. वाळूचा मोठा उपसा होत नसल्याने चांगल्या प्रतीचा मुबलक वाळूपट्टा येथे तयार झाला आहे. मोठ्या प्रमाणातील वाळू साठ्यामुळे परिसरातील पाणी पातळी टिकून आहे. या घटनेतील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकास ग्रामस्थांनी वेळोवेळी वाळू वाहतूक करण्यास मज्जाव केला होता; मात्र त्याने आपली वाहतूक सुरूच ठेवली होती. रविवारी रात्रीही वाळू चोरी सुरू असताना अज्ञात लोकांनी नदीपात्रात जाऊन ट्रॅक्टरसह मोटारसायकलीस आग लावली. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक अंकुश कान्हे (राहणार सिरजगाव) याने गावातील अशोक रमेश शिरसाठ यास मारहाण केली. शिरसाठ याच्या फिर्यादीवरून अंकुश कान्हे व इतर तिघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पंडित सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सिरजगाव येथील नदीपात्रात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
वाळूचा ट्रॅक्टर पेटविला
By admin | Updated: December 15, 2015 00:02 IST