परभणी: गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ या गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या ९४ लाख ९ हजार ५०० रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हरंगुळ येथे पाणी पुरवठा योजना सुरु करण्याच्या मागणीसंदर्भातील प्रस्ताव येथील ग्रामपंचायतीने १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ४ आॅगस्ट रोजी राज्य शासनाकडे सादर केला होता. ९४ लाख ९ हजार ५०० रुपये एवढा वाढीव दरडोई खर्च असलेल्या या योजनेच्या अंदाजपत्रक व प्रशासकीय आराखड्यास नुकतीच राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शासन निर्णयाप्रमाणे या योजनेसाठी हरंगुळ ग्रामपंचायतीला लोकवाटा भरण्याची गरज राहणार नाही. सदरील योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत/ ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला करावी लागणार आहे. तसेच योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायत /पाणीपुरवठा समितीकडेच राहणार आहे. येथील ग्रामस्थांकरिता प्रती घर ९०० रुपये पाणीपट्टी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले असून गावात १०० टक्के नळजोडण्या देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
हरंगुळच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी
By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST