लोहारा : तालुक्यातील मोघा (बु.) गावामध्ये सध्या भिषण पाणीटंचाई निर्माण असून, एकाच टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्याही दिवसभरात केवळ दोन खेपा होत असून, पाणी आडात (विहिरीत) टाकून सार्वजनिक टाकी, नळाव्दारे प्रत्येक कुटूंबाला एकावेळी पाच घागरी याप्रमाणे वितरित केले जाते. त्यामुळे घागरभर पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. साडेसातशे लोकसंख्या असलेले मोघा (बु.) गावच्या पाणी पुरवठ्यासाठी अद्यापपर्यंत कुठलीही पाणीपुरवठा योजना राबविली गेली नाही. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या दोन बोअर आणि एक हातपंपाव्दारे गावकऱ्यांची तहान भागविली जात असून, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात हे बोअर, हातपंपही कोरडेठाक पडत असल्याने गावाशेजारील एक-दोन बोअर अधिग्रहीत करून गावची तहान भागविण्याची नामुष्की प्रशासनावर येते. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे तलाव, साठवण तलाव कोरडेठाक पडत असून, यंदा तर मोघासह परिसरातील विहिरी, बोअर देखील पूर्णपणे आटून गेले आहेत. त्यामुळे गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सुरूवातीला या टँकरची केवळ एकच खेप होत होती. मात्र, हे पाणी अपुरे पडू लागल्यामुळे ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवून टँकरच्या दोन खेपा सुरू केल्या. परंतु, टँकरवर पाणी भरताना भांडण-तंटे वाझू लागल्याने टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहिरीत टाकून दोन सार्वजनिक नळ व एका टाकीत सोडून गावाला वितरित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. तसेच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांनी रांगेत कितीही घागरी ठेवल्या तरी प्रत्येकाला पाचच घागरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिवसभरात एका कुटूंबाला साधारण दहा घागरी पाणी मिळत आहे. ज्या कुटूंबाकडे जनावरे आहेत. त्याचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. (वार्ताहर)
एकाच टँकरवर गावची मदार
By admin | Updated: May 23, 2016 23:55 IST