औरंगाबाद : मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांचे कंत्राट घेतलेल्या लक्ष्मण शिंदे यांच्याकडून आगाऊ रक्कम घेऊन मतदार याद्यांची व्रिकी होत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. भारतनगर वॉर्ड क्र. ११३ मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या एका विद्यमान नगरसेवकाचा शिंदे हा नातेवाईक असून मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यातही त्याचाच हात असल्याची चर्चा आहे. मतदारांची पळवापळवी थांबविण्याऐवजी लक्ष्मीनगर, काबरानगरमधील ३५० मतदार नव्याने वॉर्ड क्र. ११३ मध्ये घुसविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे काही जण कोर्टात धाव घेऊन वॉर्ड क्र. ११३ च्या निवडणुकीवर स्थगिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. रंगीत छायाचित्रे असणाऱ्या मतदार यादीची किंमत १५ ते २० हजार रुपयांच्या आसपास आहे. मनपाकडून ब्लॅक अॅण्ड व्हाईट यादी ५०० रुपयांना दिली जात असून, त्यातील मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट दिसत आहेत. तसेच मनपाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली यादीदेखील चुकीच्या फॉरमॅटमध्ये टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे ती यादीही स्पष्टपणे दिसत नाही. तिची प्रिंटही निघत नाही. मतदार याद्या बनविणाऱ्या कंत्राटदाराचा धंदा तेजीत यावा. त्यासाठी हा सगळा कुटाणा करण्यात आल्याचा आरोप मनपावर होतो आहे. मनपाची यादी ५०० रुपयांना आणि कंत्राटदाराकडून मिळणारी यादी १५ हजार रुपयांना हा प्रकार सावळागोंधळ निर्माण करणारा आहे. यावर निवडणूक विभागातील अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.
मतदार यांद्याची ‘ब्लॅक’मध्ये विक्री
By admin | Updated: April 1, 2015 01:05 IST