बीड : सेवानिवृत्तीनंतर अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय अधिकार संपुष्टात येतात;परंतु एका मुख्याध्यापकाने सेवा कालावधी संपल्यानंतरही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मासिक वेतन काढले. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कोल्हारवाडी येथील खासगी माध्यमिक शाळेत नुकताच उघडकीस आला आहे. झाले असे, श्री. वडजी विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे कोल्हारवाडी येथे शहांगीरबाबा विद्यामंदिर आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची येथे सोय आहे. मुख्याध्यापक नानाभाऊ अनंतराव मोरे हे ३० नोव्हेंबर २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले. मोरे हे संस्थेत पदाधिकारी देखील आहेत. तथापि, २० नोव्हेंबर २०१५ रोजी संस्थेने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाला पत्र पाठवून मोरे यांना वर्षभरापर्यंत मुख्याध्यापकपदावर सेवा मुदतवाढ मागितली होती. मात्र, माध्यमिक विभागाने ही मुदतवाढ नाकारली. मोरे हे निवृत्त झालेले असताना व त्यांच्या सेवा मुदतवाढीला परवानगी दिलेली नसतानाही त्यांनी डिसेंबर २०१५ ते फेबु्रवारी २०१६ पर्यंतचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन काढले. शिक्षकांच्या आॅनलाईन वेतनासाठी ‘शालार्थ’ ही प्रणाली लागू आहे. निवृत्तीनंतरही मोरे यांनी सर्व शिक्षकांची वेतनबिले तयार करुन शालार्थ प्रणालीवर माहिती भरली. ‘हार्डकॉपी’ वरुन वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने हे बिल मंजूर केले अन् शिक्षकांच्या खात्यात वेतन ही जमा झाले. डिसेंबर २०१५ ते फेबु्रवारी २०१६ पर्यंत अशाच पद्धतीने निवृत्त मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने तयार झालेल्या बिलावरुन मासिक वेतन निघत गेले. या शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे मिळून दहा जण कार्यरत आहेत. त्या सर्वांच्या एकत्रित मासिक वेतनाची रक्कम पाच लाख रुपयांच्या घरात आहे. तीन महिन्यांचे मिळून जवळपास पंधरा लाख रुपये नियमबाह्यपणे अदा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शाळेतील एका कर्मचाऱ्याचे फेबु्रवारी २०१६ मधील वेतन निघाले नाही. त्यामुळे त्यांनी माध्यमिक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर मोरे यांचे बिंग फुटले. याबाबत वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक हेमंत वाटाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
निवृत्त मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने वेतन
By admin | Updated: March 24, 2016 00:51 IST