उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी चार खाटांचे सुसज्ज प्रसुतीगृहे उभारण्यात आली. मात्र प्रसुतीगृहातील इलेक्ट्रीकची कामे केली नाहीत. तसेच प्रसाधनगृह उभारण्यात आले. परंतु, त्यासाठी सेफ्टी टँक बांधले गेले नाहीत. हा सर्व गोेंधळ चार वर्षानंतर उजेडात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च होवूनही ही यंत्रणा वापराविना पडून राहिली. आता या अपूर्ण कामांसाठी ३० लाख ४८ हजाराचा निधी उपलब्ध झाला आहे. झेडपीचा या कारभाराबाबत रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.रुग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढावे, यासाठी शासन आरोग्य केंद्रांना बळकट करीत आहे. परिणामी घरगुती प्रसुतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुसज्ज चार खाटांचे स्वतंत्र प्रसुतीगृह उभारले. यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. प्रसुतीगृहे उभारुन तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला. मात्र ही सुविधा वापरात आली नाही. त्याला कारणही तसेच मजेशीर आहे. बांधकाम विभागाने प्रसुतीगृहाची इमारत उभारली. मात्र त्यामध्ये विद्युतीकरणाचे काम केले नाही. त्याचप्रमाणे प्रसाधनगृह उभारले. परंतु त्यासाठीचा सेफ्टी टँक बांधला गेला नाही. अशा प्रसुतीगृहांची संख्या २६ इतकी आहे. दरम्यान, प्रसुतीगृहामध्ये विद्युतीकरण आणि प्रसाधनगृहासाठी सेफ्टी टँक उभारला नसल्याने मागील काही वर्षांपासून ही सुविधा वापराविना पडून होती. असे असतानाही याबाबतीत ना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाऊल उचलले, ना त्या-त्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी या बाबतीत पुढाकार घेतला. या दोन्ही यंत्रणांच्या गोंधळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांना मात्र, गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. (प्रतिनिधी)
सेफ्टी टँकविनाच प्रसाधनगृह !
By admin | Updated: April 16, 2015 00:58 IST