वडवणी : वडवणी तालुक्याला नंदनवन करणारा उर्ध्व अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्प बनविण्यासाठी शासनाने रुई गावातील नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या व गावाचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली केल्या. यामध्ये अनेकांची घरे गेली. या कुंडलिकेचे पाणी रोखल्याने गावास धोका निर्माण झाला आहे.अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे असून, रुई गावातील नागरिकांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढत असून, वाढत्या पाणीसाठ्यामुळे गावाच्या चारही बाजुने पाणी व्यापेल की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून रुई गावातील नागरिकांचे पुनर्वसन गावाच्या डोंगर पायथ्याखाली केले. त्याठिकाणी शेड उभारुन ग्रामस्थांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. डोंगर पायथ्याशी कमी जागेत पुनर्वसन होणार कसे? हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ज्याठिकाणी सुरक्षित जागा आहे व सोयी, सुविधा आहेत, अशा ठिकाणीच आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चांगल्या ठिकाणी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत गाव सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्राही ग्रामस्थांनी घेतला आहे. मंगळवारी उपजिल्हाधिकारी अविनाश पाठक, संतोष देशमुख, सी.एम. ढोकणे, डोणगावकर, एन.जी. झंपलवार यांनी गाव खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सपोनि संतोष साबळेंस पोलीस बंदोबस्तही होता. प्रशासन ग्रामस्थांवर दबाव आणत असल्याचा आरोप उपसरपंच संजय आंधळे यांनी केला आहे. सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)प्रशासनाने येथील नागरिकांना अद्यापही त्यांना हक्काची जागा दिलेली नाही. डोंगराच्या पायथ्याला तात्पुरते पत्र्याचे शेड ठोकून दिले आहे. मागील तीन दिवसांपासून तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे कुंडलिकेला पूर आला आहे. त्यामुळे शेडच्या आजुबाजूची दगड, माती वाहून जात आहे. येथील नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर सुरक्षित जागेत करावे, अशी मागणी येथील गजानन शिंदे, संजय लोंढे, उमेश लोंढे आदी तरुणांनी केली आहे.
अप्पर कुंडलिकाची धार कोंडल्याने रुई गाव धोक्यात !
By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST