वडवणी : तालुक्यातील रुई येथे असणाऱ्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पात पाणी आले असून, या पाण्याने रुई गावाला संपूर्ण वेढले आहे. त्यामुळे येथे येणारी बस सेवा बंद झाली आहे. वडवणीला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होत असून, सोमवारी विद्यार्थ्यांनी बस दुसऱ्या मार्गे सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी तहसीलदारांकडे धाव घेतली.तालुक्याला नंदनवन करणाऱ्या उर्ध्व कुंडलिका प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे. या प्रकल्पातील पाण्याने रुई गावाला चोहोबाजुने वेढले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, मागील पंधरा दिवसांपासून बससेवा बंद आहे. या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वडवणीला येतात. मात्र बससेवा बंद असल्याने हे विद्यार्थी पंधरा दिवसांपासून शाळेत जाऊ शकले नाहीत. प्रकल्पात पाणी येण्यापूर्वी रुई आणि मैराळेवस्ती येथे बस चालू होती. या पाण्यामुळे येणारी बस बंद झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत.पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी प्रशासनाने या विद्यार्थ्यांची कुठलीही सोय केलेली नाही. त्यामुळे सोमवारी विद्यार्थी व पालक आक्रमक झाले होते. पूर्वी सोडण्यात येत असलेली बस वडवणी-घाटसावळी-देवळा-खडकी-मैराळेवस्ती-रुई अशी सोडावी ही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. लवकरात लवकर बससेवा सुरु करुन विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. या निवेदनावर रणजित आंधळे, सतीश आंधळे, संगीता आंधळे, अनिता भांगे, प्रतीक्षा गवळी आदींसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
रुईच्या विद्यार्थ्यांची तहसीलदारांकडे धाव
By admin | Updated: September 10, 2014 00:48 IST