जायकवाडी : रात्रीच्या वेळी काही भागांतील वीज गेल्याने ती दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढलेल्या ३२ वर्षीय युवकाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना पिंपळवाडी परिसरातील गणेशनगर भागात रविवारी रात्री घडली. उमेश जगन्नाथ मुळे असे मयत युवकाचे नाव आहे.
रविवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास रोहित्रात बिघाड झाल्याने काही भागातील वीज गेली होती. गावात लाईनमन उपलब्ध नसल्याने तसेच उमेश मुळे यांना विजेचे काम येत असल्याने ते दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजनांविना रोहित्रावर चढले. मात्र, पाय घसरुन त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. यात उमेश मुळे यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती नागरिकांनी एमआयडीसी पैठण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उमेश मुळे यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार विठ्ठल ऐटवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार खंडू मंचरे, रामेश्वर तळपे, संपत दळवी हे करीत आहेत.
चौकट
महावितरणच्या भाेंगळ कारभाराचा बळी
गणेशनगर भागात किरकोळ बिघाड होऊन वीज जाण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र, येथे लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे विजेचे थोडेफार काम येणाऱ्या उमेश मुळे यांना नागरिक शंभर, दोनशे रुपये देऊन त्यांच्याकडून वीज सुरळीत करून घेत असत. याचप्रमाणे रविवारी रोहित्रात बिघाड होऊन काही भागातील विजपुरवठा खंडित झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी उमेश मुळे हे वीज प्रवाहित असताना, रोहित्रावर चढले. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा वीज दुरुस्त केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, यावेळी पाय घसरल्याने त्यांचा घात झाला आणि विजेचा धक्का लागून त्यांचा मृृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर आले आहे.