खासगी रुग्णालयात लूट शेख महेमूद तमीज वाळूज महानगरवाळूज महानगरात डेंग्यू व चिकुन गुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून या परिसरात खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. अशातच तिघांचा बळी गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन खाजगी रुग्णालयांनी या गरीब कामगार रुग्णांची लूट सुरू केली असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे कामगारांत असंतोषाचे वातावरण आहे.बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी, सिडको वाळूज महानगर, वडगाव कोल्हाटी इ. ठिकाणी अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले आहेत. स्थानिक ग्रामपंचायती, तसेच एमआयडीसी प्रशासनाचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. डेंग्यूमुळे तिघा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. बजाजनगर परिसरातील खाजगी रुग्णालये साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. गरीब कामगार रुग्णांची लूट खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरू केली आहे. रुग्णालयात येताच खाजगी डॉक्टर डेंग्यूची भीती दाखवीत त्वरित अॅडमिट होण्याचा सल्ला देतात. धास्तावलेले रुग्णही लगेच अॅडमिट होतात. डिपॉझिटच्या नावाखाली ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली जाते. यानंतर डेंग्यूची तपासणी करण्यासाठी विविध तपासण्यांसाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. तपासण्या झाल्यानंतर रुग्णांना चार ते पाच दिवस रुग्णालयातच अॅडमिट होण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णांकडून विविध चाचण्या आदींच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. गरीब कामगारांची लूट सुरू केल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे.
खासगी रुग्णालयात लूट
By admin | Updated: August 6, 2014 02:38 IST