उस्मानाबाद : दरोड्याच्या तयारीत असताना पकडण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लातूर येथील एका इसमाला येडशी चौकातून वाहनात घेवून त्याची लूट केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा येथील शिवशरण बाबूराव कबाडे (वय-४४ ह़मु़लातूर) हे १९ आॅगस्ट रोजी रात्री ८ ते ८़३० वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील येडशी चौकात थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या एका कारमधील युवकांनी शिवशरण कबाडे यांना कोठे जायचे आहे ? अशी विचारणा केली़ त्यावेळी कबाडे यांनी आपणास लातूरला जायचे असे सांगितले़ त्यानंतर कबाडे यांना त्या युवकांनी कारमध्ये घेतले़ येडशीपासून काही अंतरावर कार गेल्यानंतर कबाडे यांना दमदाटी करून त्यांच्याकडील रोख १७ हजार ९८० रूपये काढून घेतले़ कबाडे यांचा मोबाईल घेवून त्यातील बॅटरी काढून त्यांना मोबाईल परत दिला व दरोडेखोरांनी तडवळे गावाजवळ त्यांना कारमधून खाली सोडून तेथून पोबारा केला़ चोरट्यांनी लूट केल्यानंतर घाबरलेल्या कबाडे यांनी तक्रार दिली नव्हती़ दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व वाशी पोलिसांनी सरमकुंडी फाट्यावरून दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना जेरबंद केले़ पोलिसांनी वाहनात प्रवाशी म्हणून घेवून लूट केली असेल तर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन केले होते़ पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर शिवशरण कबाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ कबाडे यांच्या फिर्यादीवरून अटकेतील पाच दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पाच जणाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा
By admin | Updated: August 22, 2016 01:14 IST