औरंगाबाद : विविध ठिकाणच्या पोलिसांना त्रस्त करणारी आंतरराज्य दरोडेखोरांची टोळी हर्सूल पोलिसांनी रात्री पकडली. यात तीन महिलांचा समावेश आहे. या टोळीकडून रोख दोन लाख रुपये आणि दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज आणि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. दौलसिंग सोलंकी (५५), मायादेवी दौलसिंग सोलंकी (५०, दोन्ही रा. एल बिलायात, ता. बडवरा, जि. कटनी, मध्यप्रदेश), सिंधू चव्हाण (२५), मिश्रीलाल चव्हाण (७०, रा. सुलतानाबाद, ता. गंगापूर), सिंधू काळे (६०, रा. जहांगीर कॉलनी, हर्सूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले की, जहांगीर कॉलनी येथे एका घरी काही संशयित व्यक्ती आल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपण स्वत: आणि फौजदार कल्याण चाबुकस्वार, कर्मचारी रावसाहेब मुळे, सहायक फौजदार बिघोत, अरविंद पुरी, महिला पोलीस कर्मचारी सांगळे, गायकवाड यांनी जहांगीर कॉलनी येथे छापा मारला. त्यावेळी तेथे हे लोक सापडले. झडती घेतली असता तेथे धारदार चाकू, कोयता, मिरची पावडर, दोरी असे दरोड्यासाठी वापरले जाणारे सामान सापडले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी त्यांच्या बॅॅगेची आणि महिला कर्मचाऱ्यांनी महिला आरोपींची झडती घेतली असता महिलांच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात रोख २ लाख २ हजार रुपये आढळले. १ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा यात समावेश होता. दुसऱ्या एका महिलेच्या अंगावरील कपड्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आढळले. यात सोन्याची साखळी, अंगठ्या, मंगळसूत्र, डोरले, मोत्याच्या माळी, २२ कॅरेट सोन्याची प्लेट असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज मिळाला.
मध्यप्रदेशातील दरोडेखोर पकडले
By admin | Updated: June 14, 2016 00:10 IST