उमरगा : तालुक्यातील एकोंडी (ज.) येथे दूषित पाण्यामुळे काविळीच्या आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर एकोंडी (ज.) एकोंडीवाडी अशी दोन गावे आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या साधारणपणे पाच हजाराच्या जवळपास आहे. या गावातील ग्रामस्थांना बारमाही पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एकोंडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावातच जुनाट विहीर आहे. त्याव्यतिरिक्त एका विंधन विहिरीवर अवलंबून राहावे लागते. कधी एकेकाळी उभारण्यात आलेल्या विहिरीभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी या विहिरीत गेल्या अनेक वर्षापासून साचलेले आहे, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. आज बुधवारी या गावाची प्रत्यक्ष पाहणी करून सरपंच विक्रम इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून या गावात काविळीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काविळीच्या आजारामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. काविळीच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी या गावातील अनेकजण कर्नाटकातील कोत्तल हिपरगा येथे दर शनिवारी व रविवारी जात आहेत. या गावातील महिला व बालके काविळीच्या आजाराने त्रस्त आहेत. असेही येथील पांडुरंग गायकवाड, श्रीनिवास इंगळे, मधुकर कौलगे, हणमंत सावट, गजेंद्र इंगळे, रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले. यासंदर्भात येथील ग्रामसेविका पूजा स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विंधन विहिरीचे पाणी दूषित असल्याचा संशय आल्याने ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सदरील गावाला तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी भेट देऊन पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. (वार्ताहर) घागरभर पाण्यासाठी भटकंती दूषित पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने गावातील एकमेव विंधन विहिरीच्या पाण्यावर गावकर्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. परंतु संपूर्ण गावकर्यांना एका विंधन विहिरीवर तहान भागविता येत नसल्याने अनेकांना घागरभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून एकोंडी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावची तहान भागविण्यासाठी सरपंच विक्रम इंगळे व उपसरपंच प्रमोद पाटील यांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे अधिग्रहणाबाबतचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तहसीलदार सबनीस यांनी तातडीने या गावाचा प्रस्ताव मंजूर करून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
दूषित पाण्याचा धोका !
By admin | Updated: May 14, 2014 23:55 IST