औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षा चालविणे अवघड झाले आहे. खड्ड्यातील दणक्यांमुळे रिक्षा दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. शिवाय मान, कंबरदुखीचे आजारही बळावत आहेत. त्यामुळे महापालिकेने युद्धपातळीवर काम करून रस्ते दुरुस्त करावे, अन्यथा २ मेपासून रिक्षाचालक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा मराठवाडा आॅटोरिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष शिवाजी दिवेकर, सरचिटणीस रामदास खिल्लारे, कोषाध्यक्ष मो. अब्दुल रऊफ, सहसचिव एस. के. रफिक, शहराध्यक्ष मोहंमद मोहसीन यांची उपस्थिती होती. रस्त्यातील खड्ड्यांमुळे रिक्षा दुरुस्तीसाठी २ ते ३ हजार रुपये खर्च करण्याची वेळ येत आहे. शहर खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे ही प्रतिमा बदलण्यासाठी ‘काम करा नसते चालते व्हा’ हे आंदोलन हाती घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम महापालिकेवर आॅटोरिक्षाचालकांचा मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येईल.
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी रिक्षाचालक आक्रमक
By admin | Updated: April 6, 2016 01:28 IST