औरंगाबाद : परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी काही रिक्षा व अॅपेरिक्षा संघटनांनी बंद पाळला. यामध्ये जालना रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकांसह अन्य मार्गावर १० ते १५ रुपयांत टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, अॅपेरिक्षा बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांना जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागला. रिक्षा बंदमुळे प्रवाशांची पायपीट झाली व पालकांची धावपळ आणि शहर बसला गर्दी बघायला मिळाली.या बंदमुळे २४ तास वर्दळीचा जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानकांसह विविध भागांत रिक्षांची तुरळक गर्दी दिसली. त्यामुळे रस्त्यांवर उभे राहून प्रवासी रिक्षा, अॅपेरिक्षांची वाट बघत होते. ये-जा करणाऱ्या रिक्षांना हात दाखवून थांबवताना प्रवासी दिसले. बसथांब्यांजवळ रोज रिक्षा, अॅपेरिक्षांची गर्दी असते; परंतु आज रिक्षांपेक्षा प्रवाशांची गर्दी दिसली. या बंदमध्ये काही रिक्षा संघटनांचा सहभाग नसल्यामुळे या ‘बंद’ला १०० टक्के प्रतिसाद मिळाला नाही. तरीही प्रवाशांना रिक्षांची शोधाशोध करावी लागली. प्रसंगी मीटरने जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागला. शहरात आलेल्या पाहुण्यांना बंदची माहिती नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचा संशय आला.पालकांची धावपळशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या काही रिक्षाही बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी पालकांची धावपळ झाली. शाळा परिसरात विद्यार्थ्यांचे पालक दुचाकी व अन्य वाहनांनी येताना-जाताना दिसले. अनेक पालकांनी शहर बसमधून विद्यार्थ्यांना सोडले. रिक्षा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे आणि घेऊन जाण्याचे काम किती अवघड असते, याचा अनुभव आल्याचे काही पालकांनी सांगितले.प्रवाशांची पायपीटमध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे बाहेरगावाहून आलेले प्रवासी रिक्षांच्या प्रतीक्षेत होते. रिक्षांचालकांना आवाज देऊन बोलावले जात होते; परंतु ते येत नव्हते.अनेक जणांनी जास्त पैसे मागितले. त्यामुळे अनेक प्रवासी आपली सुटकेस, बॅग्ज घेऊन रस्त्यावर आले. काही प्रवाशांनी स्थानकावर थांबून नातेवाईकांना वाहन घेऊन बोलावले. लोडिंग रिक्षामधूनही काही प्रवासी स्थानकावर आल्याचे दिसले.धावणाऱ्या रिक्षांना विरोधअनेक ठिकाणी प्रवाशांनी हात दाखविल्यावरही रिक्षा, अॅपेरिक्षा थांबत नव्हत्या. जे रिक्षा, अॅपेरिक्षा थांबवून प्रवासी घ्यायचे, त्यांना अन्य रिक्षाचालक विरोध करीत होते. त्यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसली. अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा अडविण्यात आल्या. शहर बसलाही काही ठिकाणी विनाकारण अडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती एस. टी. महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.शहर बससेवेला फायदा...रिक्षा बंदचा फायदा शहर बससेवेलाच जास्त झाल्याचे दिसले. एस. टी. महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊन नये, यासाठी जादा शहर बसेस सोडल्या. रोज ३० ते ३५ धावणाऱ्या बसची संख्या बंदमुळे ७० करण्यात आली. यामध्ये पासिंगसाठी आलेल्या बसेसचाही वापर करण्यात आला. जवळपास ६० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, औरंगपुरा, हर्सूल, वाळूज परिसर आदी मार्गांवर या जास्तीच्या बसेस सोडण्यात आल्या. तरीही ठिकठिकाणी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. काही वेळा शहर बसेस भरून जाताना दिसल्या. बंदच्या आदल्या दिवशी शहर बसचे उत्पन्न १ लाख ५७ हजार रुपये होते. बुधवारी दिवसभरात जवळपास ४ ते ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.
रिक्षा बंदचा प्रवाशांनाफटका
By admin | Updated: June 26, 2014 00:59 IST