वाळूज महानगर : महसूल विभागाच्या कारवाईमुळे वाळूमाफियांत भीतीचे वातावरण पसरले असून, काल वाळूज परिसरात पथकाने वाळूची चोरटी वाहतूक करणारी दोन वाहने पकडली आहेत. वाळूज औद्योगिक परिसरात शासनाचा महसूल बुडवून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. चोरीछिपे वाळूमाफिया पैठण व शेंदुरवादा परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक करीत असतात. शासनाचा महसूल बुडवून टिप्पर, हायवा ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर इत्यादी वाळूची चोरी बिनधास्तपणे सुरू आहे. वाळूज औद्योगिक परिसर तसेच पश्चिम महाराष्टÑात वाळूला चांगली मागणी असल्यामुळे वाळूमाफिया या भागातून वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाला चुना लावत आहेत. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गंगापूर महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध ठिकाणी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. या भरारी पथकांमार्फत ठिकठिकाणी सापळे रचून वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तीन दिवसांपूर्वी या भरारी पथकाने वाळूज परिसरात सापळा रचून वाळूची चोरटी वाहतूक करणारी एएम-१७, एबी-८४५५, एमएच-२०, सीपी-९९८२ व एमएच-२०, डब्ल्यू-७७५५ ही तीन वाहने पकडली होती. या प्रकरणी दत्तात्र्यय सुसे (रा. जळका, ता. नेवासा), ज्ञानेश्वर गावंडे (रा. धामोरी, ता. गंगापूर) व अप्पासाहेब गायकवाड (रा. पैठण) यांच्याकडून ७३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. काल ३० मे रोजी या भरारी पथकाने एमएच-१७, टी-२९९१, एमएच-१५, सीके-२४४२ ही वाहने पकडून वाळूज व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले.
वाळूमाफियांविरुद्ध महसूलची कारवाई
By admin | Updated: June 1, 2014 00:53 IST