गणेश लोंढे , राणीउंचेगाव घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना महिना दीड महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील राणीउंचेगाव हे मोठे गाव आहे. लोकसंख्याही चार हजारांच्या वर आहे. मात्र शासनाच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून पाच किमी लांबीच्या जलवाहिनीद्वारे १ कोटी ११ लाख रुपये खर्च करुन भारत निर्माण योजनेचे काम करण्यात आले आहे. योजना पूर्ण झाल्यावर पाणीटंचाई संपेल अशी ग्रामस्थांना आशा होती. तीही आतामावळली आहे. २००९ पासून टंचाई कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. विहिरीवरुन जलवाहिनीद्वारे गावात पाणी आणण्यात आले आहे; परंतु ग्रामपंचायतीचे नियोजन कोलमडले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भागम्भाम सकाळपासूनच सुरू असते. जलवाहिनीसोबतच हातपंपही आहे. नियमित देखभाल नसल्यामुळे ९ हातपंप बंद आहेत. पंचायत समितीने हे हातपंप तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कडक उन्हाळ्यातही ग्रामपंचायत पाणीटंचाईचे नियोजन करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. इंदिरानगर भागातील रहिवाशांना बारमाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना टँकरसाठी दररोज पैसे मोजावे लागत आहेत. ठराविक भागांमध्ये मुबलक पाणी गावातील काही ठराविक वस्त्या तसेच भागांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर भागातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. असा भेदभाव केला जातो? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी म्हणाले,गावातील ज्या भागामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशा भागामध्ये पाणी सोडण्यासाठी वेगळ्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राणी उंचेगावात पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: May 7, 2014 23:56 IST