औरंगाबाद : शासनाने सादर केलेल्या शहर विकास आराखड्याचे पाकीट दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत फोडण्यात आले. आता नवीन विकास आराखड्याचा अभ्यास अनेक नागरिकांनी सुरू केला आहे. यामध्ये अनेक चुका झाल्याचे समोर येत आहे. पूर्वीच्या येलो झोनला ग्रीन झोन करण्यात आले आहे. काही भागात तर अधिकृत नागरी वसाहतींवर उद्यानाचे आरक्षण टाकल्याचे समोर येत आहे. या गंभीर चुकांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.शहर विकास आराखड्याचे नकाशे दोन दिवसांपासून महापौर कार्यालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. नकाशे पाहण्यासाठी नागरिक अलोट गर्दी करीत आहेत. काही झेरॉक्स चालकांनी नकाशाची प्रत मिळवून तीनशे ते चारशे रुपयांना नकाशे विकण्याचा ‘उद्योग’मनपा मुख्यालयाजवळ सुरू केला आहे. बीड बायपास रोडवरील गट नं. ३२ हा नागरी वसाहतीसाठी यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. त्याआधारे मनपाने शंभरपेक्षा अधिक घरांना बांधकाम परवानगी दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने या परिसराला एन-ए-४४ ची मंजुरी दिली. नागरिकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून बंगले, घरे बांधली. या भागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन, पाण्याची लाईन, पथदिवे आदी सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. मंजूर रेखांकनातील ओपन स्पेसही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली. सेल्फ डेव्हलपमेंट अंतर्गत मन्नान खान यांनी स्वत:च्या खिशातून नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मनपाने बांधकाम परवानगी देताना ज्या अटी व शर्थी टाकल्या होत्या, त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
अधिकृत नागरी वसाहतीवर आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:56 IST