१६ जणांचा समावेश : औरंगाबादसह सोलापूर, नगर, बीड येथे उत्तम कामगिरी
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : पैठण येथील बापलेकावर हल्ला करणारा बिबट्या, सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघ तसेच अहमदनगर, बीड आदींसह अन्य ठिकाणी हिंस्र वन्यप्राण्यांना सुरक्षितपणे पकडण्याची कामगिरी औरंगाबादेतील वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने केली आहे. आतापर्यंत सुमारे १०० वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.
अलीकडे शहरालगतच्या काही भागांत बिबट्याचे नेहमी दर्शन होते. शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटनाही नेहमीच्याच झाल्या आहेत. अशावेळी वनविभागाला नाशिक किंवा नागपूर येथून विशेष पथक मागवावे लागत होते. ३ डिसेंबर २०१९ रोजी सिडको एन- १ परिसरात पकडलेल्या बिबट्याने तर शहरात खळबळच उडवून दिली होती. बिबट्या किंवा अशा हिंस्र प्राण्यांना पकडण्यासाठी विशेष पथकाची प्रतीक्षा करण्यामध्ये बराच कालावधी लोटला जात असे. दरम्यान, वन्यप्राण्यांना जेरबंद करण्यासाठी औरंगाबादेत रॅपिड रिस्पॉन्स युनिट असावे, अशी अपेक्षा वनविभागाची होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २०१८ त्यासाठी विशेष निधी मंजूर केला. त्यानुसार सहायक वनसंरक्षक प्रशांत वरुडे यांच्या अधिपत्याखाली हे शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले. सध्या सहायक वन संरक्षक सचिन शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, वनपाल मनोज कांबळे, वन्यजीव अभ्यासक आदी गुडे यांच्यासह १६ जणांची टीम आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला जाधव यांचाही यामध्ये समावेश आहे.
सातारा : देवळाई डोंगरात बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यावेळी या पथकाने संपूर्ण डोंगर पिंजून काढला. कॅमेरेही लावण्यात आले होते. जंगलात जाण्यासाठी बंदी करण्यात आली होती. सोयगाव, सिल्लोड तालुक्यात वाघाचे दर्शन, सोलापूर तसेच विविध ठिकाणी बिबट्या व हिंस्र प्राणी दिसले. काही ठिकाणी वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या.
अत्याधुनिक गनचा वापर...
शेतवस्ती किंवा खेड्यात त्रासदायक ठरणाऱ्या बिबट्या, वानर, वन्यजीवांना पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे जुनाट यंत्रणा होती. आता या पथकामध्ये अधुनिक गण असून, वन्यप्राण्यांना सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासा सोडण्यात येते. औरंगाबादसह सोलापूर, पाथर्डी, अहमदनगर आदी ठिकाणी बिबट्या, माकड व त्यांची पिल्ले पकडण्यात आली. जवळपास १०० वन्यप्राणी सुरक्षित पकडण्यात आले आहेत.
कॅप्शन..,
१) आपतकालीन प्रसंगी शीघ्र कृती दलाचे औरंगाबादेतील पथक,
२) गणच्या सहायाने प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी नेम धरणारा शिघ्र कृती दलाचा जवान, ३) वन विभागाच्या शीघ्र कृती दलाचे वाहन.