मंठा : तालुक्याच्या आठवडी बाजाराचा नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात आहे. बैल आणि भुसाराची खरेदी विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु हा आठवडी बाजार घाणीच्या विळख्यात सापडला आहे. या घाणीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. तर ग्राहकांनाही चिखल तुडवतच बाजारात जाऊन भाजीपाला व अन्य वस्तू खरेदी करण्याची वेळ आल्याने नागरिकांत तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.मंठा शहरालगत असलेला आठवडी बाजार अधिकृत बांधकामांबरोबरच आता घाणीच्या विळख्यात सापडल्याने महिला , पुरूषांना चिखलातूनच पायपीट करावी लागते. तर व्यापाऱ्यांनाही आपले भाजीपाला, कापड, किराणा, हॉटेल या व्यवसायांसाठी चिखलालगतच दुकान थाटून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. या आठवडी बाजाराच्या अगोदर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र घाण आणि चिखल झाला. शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या हर्राशीपोटी नगर पंचायतला लाखो रुपये मिळतात. परंतु रस्त्यावर अथवा बाजारात मुरूम टाकून घाण घालविण्यासाठी नगरपंचायत उदासीन असल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात चिखलामुळे रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. अनेक वृद्ध नागरिक बाजारकरू बाजार करताना पाय घसरल्याच्या घटना घडत आहेत. या गंभीर समस्येकडे नगर पंचायतने लक्ष देणे गरजेचे आहे.
मंठा येथील आठवडी बाजार घाणीच्या विळख्यात
By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST