गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता एसएससी बोर्डाजवळ ७०० मिलीमीटर व्यासाच्या जुन्या जलवाहिनीला मोठे भगदाड पडले. तब्बल ७ मीटर लांबीपर्यंत जलवाहिनी फुटली. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. याची माहिती मिळताच प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता के.एम. फालक यांनी तातडीने जलवाहिनीव्दारे होणारा पाणी पुरवठा बंद केला. ही जुनी वाहिनी सिमेंटची असल्याने तिला जोडण्यासाठी आवश्यक सिमेंटचे जॉइंट औरंगाबादेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने एक टीम तयार करून धुळे येथून सिमेंटचे जॉइंट आणण्यासाठी गुरूवारीच सायंकाळी पाच वाजता रवाना केली होती. धांडे यांच्यासह उपअभियंता बाविस्कर यांनी वाहनाने रात्रीच धुळे गाठले. तेथून शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान शहरात आल्यानंतर सकाळी दुरूस्तीचे काम सुरू केले. या जुन्या वाहिनीचे जॉइंट जोडण्याच्या कामाची माहिती ही एमजेपीकडे शहराचा पाणीपुरवठा असताना कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना बोलावून दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. तेजराव मानकापे, भानुदास खरात, सयाजी जाधव हे एमजेपीकडे असताना कार्यरत होते, त्यांच्याकरवी वाहिनीची दुरूस्ती केली जात आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही दुरूस्ती पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
जुन्या शहरात निर्जळी
जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बंद असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी बहुतांश भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर काही भागांत उशिराने पाणी मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. ज्या भागांत पाणीपुरवठा झाला, तेथील टप्प्पे जवळपास सहा ते सात तास उशिराने झाल्याचे कळते.