पांडुरंग खराबे , मंठाविहिर, बोअरच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. पशुधन मालकांनाही पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.मंठा तालुक्यासह शहरातही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. एका टँकरच्या पाण्यासाठी ८०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा होत नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. खाजगी विक्रीचे पाणीही लवकर मिळत नसल्याने नागरिकांचा त्यासाठी खोळंबा होत आहे. मंठा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पातून नळ योजनेचे काम सुरू आहे. परंतु हे काम पूर्ण होण्यास मोठा अवधी लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे. हेलस, कर्नावळ, हिवरखेडा, तळतोंडी, उस्वद, तळणी, ढोकसाळ, वाघोडा, शिवनगिरी, गुळखंड, अंभूर शेळके, कीर्तापूर, हेलसवाडी, वडगाव, खारी आर्डा, आकणी आदी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील ११७ पैकी सुमारे ९९ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. निम्न दुधना प्रकल्पातून या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर करण्याची मागणी सरपंचांकडून तसेच नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील लहान-मोठे तलाव आटल्याने जनावरांना पाणी मिळत नसून जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तालुक्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने टंचाईची परिस्थिती अधिक तीव्र होत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी टँकर, विहिर अधिग्रहणाची मागणी केली असून अद्याप प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.
मंठा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती
By admin | Updated: May 25, 2015 00:24 IST