नांदेड : पावसाळा सुरु होवून अनेक दिवस उलटले तरी, नांदेडकर अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळच्या वेळी पावसाचा केवळ शिडकावा होत असल्याने बळीराजाही संकटात सापडला आहे़ त्यात श्रावणाचे पहिले दोन दिवस अधून-मधून पावसाने हजेरी लावली़जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात एक दिवस झालेल्या मोठ्या पावसानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या़ परंतु त्यानंतर पावसाचा अधूनमधून केवळ शिडकावाच सुरु असल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ मृग, पुर्नवसू नक्षत्र कोरडेच गेली़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी वाहत असताना, मराठवाड्यावर मात्र कोरड्या दुष्काळाची छाया आहे़ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरीनेही तळ गाठला आहे़ त्यात रविवारपासून सुरु झालेल्या श्रावण महिन्यात समाधानकारक पावसाच्या अपेक्षेत शेतकरी असून दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरु आहे़ गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८़७७ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ त्यात नांदेड-८़८८, मुदखेड-४, अर्धापूर- ६़३३, भोकर-३़५०, उमरी-४़३३, कंधार-७़१७, लोहा- ७़६७, किनवट- ५़७१, माहूर-१५़२५, हदगाव-५़१४, हिमायतनगर-७़६७, देगलूर-१३़१३, बिलोली-१२़२०, धर्माबाद- १०, नायगांव- १०़४० व मुखेड तालुक्यात १८़७२ मि़मी़एवढ्या पावसाची नोंद झाली आहे़ दरम्यान, दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडच्या विष्णूपुरीत पाणी आणण्यात आले़ त्यामुळे नांदेडकरांना पिण्याच्या पाण्याची सध्य:स्थितीत टंचाई भासत नसली तरी, आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस न झाल्यास मात्र मोठी अडचण निर्माण होणार आहे़ त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)
सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम
By admin | Updated: July 29, 2014 01:12 IST