नांदेड : जिल्हा परिषदेअंतर्गत सामावून घेण्यात आलेल्या वसतीशाळेतील निमशिक्षकांच्या मूळ पदस्थापनेत करण्यात आलेले बदल रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले आहेत़ यासह आंतरजिल्हा बदल्यातील पदस्थापनेतील बदलही रद्द केले आहेत़ जिल्हा परिषदेतील बदल्या, आंतरजिल्हा बदल्या या शासनाने निश्चित केलेल्या कालावधीतच करण्याचे आदेश दिल्यानंतर मागील काळात झालेल्या पदस्थापनांची तपासणीही काळे यांनी सुरू केली होती़ त्यात जिल्ह्यातील निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेने सामावून घेताना पहिल्यांदाच पदस्थापना दिली होती़ पदस्थापना बदलण्यात आलेल्या दहा निमशिक्षकांना हदगाव तर एका शिक्षकाला किनवटमध्ये नियुक्त करण्यात आले होते़ मात्र जिल्हा परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार पहिल्यांदाच झालेल्या पदस्थापनेत बदल करण्यात आले होते़ हे बदलही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याच स्वाक्षरीने झाले होते़ त्यात आता त्यांनीच बदल करताना बदललेल्या पदस्थापना रद्द केल्या़ या निमशिक्षकांना मूळ पदस्थापनेच्या जागेवर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत़ आंतरजिल्हा बदलीवरून आलेल्या जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांनीही मूळ पदस्थापना बदलून आपल्याला हवे ते ठिकाणी मिळवले होते़त्या सहा शिक्षकांच्या बदललेल्या पदस्थापना रद्द करून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी जावे असे आदेश दिले आहेत़ या आदेशाची गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत़ पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार बदल करण्यात आल्याचे स्पष्ट होते़ मात्र आचारसंहितेचा अंमल सुरू होताच काळे यांनी आपल्या अधिकारांचा वापर करीत हे आदेश रद्द केले आहेत़ (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या बदललेल्या पदस्थापना रद्द
By admin | Updated: September 17, 2014 00:26 IST