संतोष धारासूरकर ,जालना ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यंतर येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनुभवत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचा भूमीपूजन सोहळा गेल्या महिन्यात पार पडला खरा; परंतू सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी इमारत स्थलांतरास अद्यापपर्यंत हिरवा कंदिल न दिल्याने जुन्या धोकादायक इमारतीतील महिला व बाल रुग्णालयाचे स्थलांतर रखडले आहे. शहराच्या मध्यवस्तीतील गांधी चमन भागात महिला व बाल रुग्णालय कार्यरत आहे. परंतु त्या रुग्णालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळेच २००६ साली या इमारतीचा सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वे केला. ती इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल सुध्दा सादर केला. येथून ही इमारत तातडीने अन्यत्र स्थलांतरीत करावी, अन्यथा अधिकाऱ्यांसह कर्मचारी व रुग्णांच्या जीवीतास धोका पोहोचेल असाही इशारा दिला. त्यानुसारच आरोग्य खात्याने तातडीने हालचाली सुरु केल्या. नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर केला. सरकारी पातळीवरील असंख्य टप्पे पार पाडीत अखेर या प्रस्तावास हिरवा कंदिल मिळाला. वर्षानुवर्षे सरकारी लालफितीतून बाहेर पडलेल्या नूतन इमारतीच्या प्रस्तावास ५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तेव्हा आरोग्य खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या इमारतीच्या बांधकामास लवकरच मुहूर्त लागेल. असे अपेक्षित होते. परंतु जुन्या इमारतीतून अन्यत्र रुग्णालयाच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न उभा राहिला. त्यातही दीड-दोन वर्ष खर्ची झाल्यानंतर जवळीच एका इमारतीत स्थलांतर निश्चित झाले. मात्र, माशी कुठे शिंकली, हे अद्याप कळले नाही. धोकादायक इमारतीतून हे रुग्णालय त्या निश्चित केलेल्या इमारतीत अद्यापपर्यंत स्थलांतरीत झाले नाही. ‘लोकमत’ने यासंदर्भात अधिक माहिती घेतली तेव्हा, धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या ‘त्या’ इमारतीवर २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. संबंधित औरंगाबाद येथील एजन्सीला बांधकाम खात्याने तो खर्च दिला नाही. परिणामी एजन्सीने ही इमारत बांधकाम खात्यास हस्तांतरीतच केली नाही. बिले द्या, असा तगादा करुन सुध्दा अभियंत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी, महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीस ५५ कोटी रुपये प्राप्त होऊन सुध्दा केवळ एका हस्तांतराच्या प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाच्या इमारतीचे स्थलांतर ठप्प झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री शेट्टी यांच्या हस्ते १० आॅगस्ट रोजी या इमारतीचे भूमीपूजन होणार होते. परंतु निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच भूमिपूजनाचा तो सोहळा गेल्या महिन्यातच आटोपन्यात आला. त्यामुळे रुग्णालय नव्या जागेत स्थलांतरीत होईल व जुनी इमारत लगेचच जमिनदोस्त केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, भूमीपूजन झाल्यानंतरसुध्दा हे काम तांत्रिक कारणे दाखवून पुन्हा लटकवण्यात आले आहे. नाशिक येथील एका एजन्सीला या इमारतीचे काम बहाल करण्यात आले असून त्या एजन्सीने बांधकामासाठी मशिनरी आणली. वाळूचा साठा जमा केला. परंतु रुग्णालय नव्या जागेत स्थलांतरीत झाले नाही. त्यामुळे संबंधित एजन्सी गेल्या महिनाभरापासून कमालीची अडचणीत सापडली आली. धोकादायक इमारत पाडल्याशिवाय नवीन इमारतीचे काम करता येणार नाही, हे स्पष्ट आहे.
रुग्णालय स्थलांतरात पुन्हा विघ्न
By admin | Updated: August 24, 2014 00:17 IST