लोकमत न्यूज नेटवर्क बनवस:पालम तालुक्यातील बनवस येथील नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता येथील ग्रामीण बँकेच्या समोर शासनाचा निषेध व्यक्त करीत यापुढे कर्ज न भरण्याची शपथ घेतली. बनवस येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९०० आहे. यापैकी ३३ शेतकऱ्यांची थकित खाती आहेत. त्यांचे कर्ज १७ लाख रुपये आहे. राज्य शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, बनवस महाराष्ट्र ग्रामीण बँकेतंर्गत बहुतांश शेतकरी पीककर्ज नियमितपणे भरणारे आहेत. नियमितपणे कर्ज भरणे हा आमचा गुन्हा आहे का? तीन वर्षांच्या दुष्काळात पशुधन कवडीमोल भावात विकून तसेच शेतमाल विकून, सावकाराचे कर्ज घेऊन बँकेचे कर्ज वेळेत फेडले. नियमितपणे कर्ज भरूनही शासन नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के अथवा जास्तीत जास्त २५ हजारांची रक्कम देत आहे. ही नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा आहे, असा संताप व्यक्त करीत बनवस परिसरातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला. त्यानंतर यापुढे कर्ज न भरण्याची शपथही घेतली.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी केला निषेध
By admin | Updated: June 30, 2017 23:45 IST