हणमंत गायकवाड , लातूरजिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वादात एकूण १२ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे हस्तांतर रखडलेलेच असून, २००९-१० मध्ये या दोन्ही विभागांनी संयुक्त पाहणी करुनही हस्तांतरासंदर्भात निर्णय घेतला नाही़ त्यामुळे ७० ते ७५ गावांची तहान भागविणाऱ्या या योजना असून नसल्यासारख्या आहेत़ तर जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या १४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी मोडकळीस आल्या आहेत़ त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या १३५ गावांवर पाणीटंचाईचे संकट आहे़ एकंदर जिल्हा परिषद आणि एजेपीच्या समन्वयाअभावी योजनांचे मातेरे झाले आहे़महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जिल्हा परिषदेला एकूण २६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत़ या योजनांत ५२ खेडी, ३० खेडी, २० खेडी, ११ खेडी, १० खेडी, ९ खेडी, ६ खेडी, ५ खेडी, ३ खेडी आदी योजनांचा समावेश आहे़ ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन या योजना तयार करण्यात आल्या आहेत़ परंतु देखभाल दुरुस्तीअभावी जिल्हा परिषदेकडे असलेल्या एकूण १४ योजना असून नसल्यासारख्याच आहेत़ वीजदेयके, दुरुस्तीअभावी या योजनेचे पाणी संबंधीत गावांना मिळू शकत नाही़ हस्तांतरीत असलेल्या या १४ योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ३२ कोटी ७ लाख रुपयाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला आहे़ परंतु शासनाने हा प्रस्ताव नाकारला असून, योजनेसाठी निधी दिला़ आता पाणीपट्टीतून देखभाल दुरुस्तीसाठी निधी आपल्या स्थरावरच उपलब्ध करावा, असे शासनाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले आहेत़ त्यामुळे ४७/५२ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अहमदपूर, ५ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वळसंगी, ११ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मोघा, ६ खेडी किनगाव-हांगेवाडी योजना, ६ खेडी किनगाव-सोनखेड पाणी पुरवठा योजना, ४ खेडी अंधोरी-दामापूरी पाणी पुरवठा योजना, ३० खेडी किल्लारी पाणी पुरवठा योजना, ६ खेडी चाकूर, १७ खेडी पाणी पुरवठा योजना आटोळा, २० खेडी पाणी पुरवठा योजना उट्टीखू, ६ खेडी मुरुड, ६ खेडी बिटरगाव आणि ९ खेडी शिवपूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असून नसल्यासारख्या आहेत़ या योजनांवरील पाणी पट्टीही थकलेली आहे़ त्यामुळे वीज देयके थकले आहेत़ अनेकदा महावितरणने वीजपुरवठा खंडीत केला आहे़ आता तर संबंधीत पाणी पुरवठा योजनेचे स्त्रोत आटले आहेत़ त्यामुळे या १४ ही योजनांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही़ या योजनांचे पुनरुज्जीवन ३२ कोटी ७ लाख रुपयाची आवश्यकता आहे़ पाणीपट्टी वसूल करुनही एवढा निधी उभा करता येत नाही़ त्यामुळे शासनाकडेच आशाभूळ नजरेने पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही़ हस्तांतरण रखडलेल्या आणि हस्तांतरीत झालेल्या एकूण २६ पाणी पुरवठा योजनांवरील २ कोटी २६ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे़ ही पाणीपट्टी वसूल झाली तरी या योजना सुरु करण्यासाठी निधी अपुराच पडणार आहे़ त्यामुळे शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे़ तसा प्रस्तावही जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला. परंतु, शासनाने हा प्रस्ताव नामंजूर केला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले़ कोट्यावधी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या एकूण १२ योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या वादात हस्तांतर रखडले आहे़ ६ खेडी शिराळा, संयुक्त गंगापूर, खंडापूर व पेठ पाणी पुरवठा योजना, १० खेडी मातोळा, ५ खेडी वडजी, ६ खेडी खरोसा, ११ खेडी पानचिंचोली, ३ खेडी डहाळेगाव, १० खेडी पानगाव, ६ खेडी राचन्नावाडी, ४ खेडी गोढाळा, ७ खेडी साकोळ, ३ खेडी शिरोळ या १२ योजनांचे हस्तांतर रखडले आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एकतर्फी हस्तांतर करुन जबाबदारी झटकली आहे़ तर जिल्हा परिषदेने हस्तांतर करुन घेण्यास नकार दिला आहे़ चाचणी, संयुक्त पाहणी आणि कमीत कमी तीन महिने योजना चालवून दाखविल्याशिवाय हस्तांतरण होऊ शकणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे़ कोट्यवधी रुपयांचा खर्च या योजनांवर झाला असताना हे दोन्ही विभाग बेफिकीर आहेत़ त्यामुळे या योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला होऊ शकला नाही़ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, जल व्यवस्थापन समितीनेही हस्तांतर करुन घेण्यास नकार दिला आहे़ कमीत कमी तीन महिने योजना चालून दाखवाव्यात तसेच या योजनांची चाचणी करण्यात यावी़ त्यानंतरच योजना हस्तांतरित करुन घ्याव्यात, असे जिल्हा परिषदेतील या समित्यांचे म्हणणे आहे़ इकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मात्र आता आम्ही योजनांचे काम पूर्ण केले आहे़ त्यात तुमच्या स्तरावर चालवाव्यात असे सांगून, एकतर्फी जिल्हा परिषदेकडे या योजना हस्तांतरित केल्या आहेत़ एकंदर या दोघांच्या वादात ग्रामीण पाणी पुरवठा योजना मात्र मोडखळल्या आहेत़