औरंगाबाद : एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय बंद केल्यास काय फायदा होणार आणि काय तोटा होणार, याचा अभ्यास सध्या केला जात आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रादेशिक कार्यालय बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु केवळ आर्थिक बचतीसाठी कार्यालय बंद करण्याचा विचार सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एस. टी. महामंडळाचे औरंगाबादसह राज्यभरात सहा प्रादेशिक कार्यालये आहेत. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना अशी सात विभाग नियंत्रक कार्यालये आहेत. प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयातून विभागातील विविध कामांचा अहवाल प्रादेशिक कार्यालयास दिला जातो. याचा आढावा घेतल्यानंतर प्रादेशिक कार्यालाकडून ही माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठवली जाते. त्यानंतर त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून निर्णय आणि कारवाई होतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विभाग नियंत्रक कार्यालय थेट वरिष्ठ कार्यालयाशी जोडण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे वेळेची बचत होऊन तात्काळ माहिती पोहोचण्यास आणि निर्णय घेणे सोयीचे होईल. परंतु अशा परिस्थितीत प्रादेशिक कार्यालयांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. महामंडळाची आर्थिक बचत कशा प्रकारे करता येईल,याचा अभ्यास सुरू आहे. परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.
‘एसटी’चे प्रादेशिक कार्यालय बंद होणार?
By admin | Updated: June 29, 2016 01:07 IST