राजेश खराडे , बीडमहावितरणच्या बीड विभागाकडे वाढती थकबाकी व मार्च अखेरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सध्या विभागात विशेष वसुली मोहीम सुरू आहे. उद्दिष्ट गाठून थकबाकीवर अंकुश आणण्यासाठी महावितरणचे अभियंते, कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन वसुली करू लागले आहेत.१ फेब्रुवारीपासून विशेष वसुली मोहिमेला सुरुवात झाली आहे. विभागाकडे हजारो कोटींची थकबाकी आहे. यामध्ये कृषी पंपधारक ग्राहकांची संख्या अधिक आहे. सध्या बीड अर्बनच्या वसुली मोहिमेत सातत्य दिसून येत आहे. महिन्यापेक्षा अधिकची थकबाकी असल्यास त्वरित विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. घरगुती, औद्योगिक, व्यापारी अशा बीड अर्बनमधील ग्राहकांची संख्या ४१ हजारांच्या घरात आहे. वसुली मोहिमेला १०-१२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, दररोज २५ लाखांचे वसुली होत असून, ४० ते ४५ ग्राहकांवर कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वसुलीत वाढ होत आहे, शिवाय वसुलीबरोबरच ग्राहकांनी मीटरशी छेडछाड केली की नाही, याबद्दल खातरजमाही होत आहे.शहरात घरगुतीबरोबरच व्यापारी ग्राहकांची संख्या अधिक असून, थकबाकीचे प्रमाणही या वर्गाकडे जास्त आहे. बीड अर्बनकडे २१ कोटींची थकबाकी असून, यामध्ये सर्वाधिक थकबाकी नगरपालिका, पोलीस मुख्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. वसुली मोहिमेकरिता शहरात विभागनिहाय सहा पथकांची नेमणूक केली आहे. त्यानुसार दिवसागणिक अहवाल अर्बनच्या मुख्य कार्यालयाकडे सादर होत आहेत. केवळ मार्च अखेरचे उद्दिष्ट न ठेवता वसुली मोहिमेत सातत्य राहणार आहे.
वसुलीकरिता अधिकारी ग्राहकांच्या दारी
By admin | Updated: February 10, 2016 00:18 IST