भूम : केवळ मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम नसल्याचे कारण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलेले मका खरेदी केंद्र ईटला हलविण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाढणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात ९७ गावे असून, यासाठी भूम येथे जिल्हा मार्केटींग फेडरेशन व कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शिवाजी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मका अधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. येथे १३६५ रुपये दराने खरेदी करण्यात येत होती. या केंद्रावर २१ डिसेंबरपर्यंत ७३० क्विंटल मक्याची खरेदी झाली असून, यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली होती. दरम्यान, येथे गोदाम उपलब्ध नसल्यामुळे माल साठवणुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत सदरील केंद्र आता ईटला हलविण्यात आले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या बाजार समितीमध्ये आडत व्यापाऱ्यांसाठी गाळे बांधकाम, अंतर्गत रस्ते या सुविधा नसल्यामुळे बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कापूस इतर जिल्ह्यात जात आहे. त्याचीही मार्केट फीस आकारण्यासाठी विषेश पथक नाही. एकच कर्मचारी वसुलीचे काम करीत आहे. आजही कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम नसल्यामुळे बहुतांश शेतीचा माल इतर बाजारपेठेत जात असून, यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गोदामाचे कारण देत मका खरेदी केंद्र ईटला हलविले
By admin | Updated: December 23, 2016 00:12 IST