विठ्ठल फुलारी , भोकरशासनाचे अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या़ जेवण्याची, राहण्याची, स्वच्छतेलाही मर्यादा पडत गेल्या़ यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिडले आणि आश्रमशाळेच्या तोडफोडसह पोलिसांवरही दगडफेक करण्यापर्यंत गोंधळ झाला़ संस्थेने चांगल्या सुविधा दिल्या असत्या तर कदाचित हा प्रकार झालाही नसता़भोकर तालुक्यातील साळवाडी (पांडुरणा) येथे संत गाडगेबाबा प्रतिष्ठान संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे़ या शाळेत १२०० विद्यार्थी असले तरी ७६० विद्यार्थी निवासी आहेत़ या विद्यार्थ्यांना संस्थेकडून सुविधा देण्यास नेहमीच टाळाटाळ झाली़ या शाळेच्या एका भिंतीच्या फलकावर आठवडी भोजन मेनू लिहिण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात येथे नाष्टा दिलाच जात नाही़ तर जेवणात भात, वरण व कच्ची पोळी दिली जाते़ भाजीचा तर पत्ताच नसतो असे येथील एका विद्यार्थ्याने सांगितले़ या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एखादा साबण दिला जातो तर डोक्याला लावायला तेलाचा तर थेंबही भेटत नाही़ मुलींच्या निवासस्थानी तर खिडकीला दरवाजा सोडा, साधा गजही बसविण्यात आला नाही़ यामुळे येथून बाहेरचा माणूस आत तर आतील विद्यार्थिनी सहज बाहेर येवू शकतात़ पाण्याचे शुद्ध जल असे जिथे लिहिले आहे, तिथे शुद्ध पाणी सोडा, साधा नळही बसविण्यात आला नाही़ विशेष म्हणजे हे शुद्ध जल शौचालयाच्या अगदी चिटकून असल्याने विद्यार्थ्यांना पाणी पितांनाही दुर्गंधीचा बचाव करावा लागाते़ शौचालय व बाथरूमची व्वयस्था तर अत्यंत दयनीय आहे़ यामुळे लहान-लहान विद्यार्थ्यांनाही रात्रीला शौचासाठी मोकळ्या हवेत जावे लागते़सदरील असुविधा बाबतीत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती़ आणि संस्थेकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबीही होत होती़ याकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून बसत असत़ शेवटी विद्यार्थी व पालकांनी संस्थेविरूद्ध आवाज उठविला़ शाळेवर दगडफेक झाली़ मोडतोड झाली़ पोलिसांवरही दगडफेक झाली़ शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत व्वयस्थित पोहंचला असता तर कदाचित साळवाडीच्या आश्रमशाळेत गोंधळ झाला नसता़
विद्यार्थ्यांची हेळसांडच कारणीभूत
By admin | Updated: August 19, 2014 02:08 IST