वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरात आषाढी यात्रेची जय्यत तयारी सुरू असून मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विश्वस्त मंडळ व नागरिकांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.एकादशीस आजूबाजूची गावे तसेच परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक व दिंड्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या काळात या भाविक व दिंड्यांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी मंगळवारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, ह.भ.प.भिकाजी महाराज खोतकर, सरपंच गौतम चोपडा, उपसरपंच महेंद्र खोतकर, माजी उपसभापती लताबाई कानडे, माजी सरपंच महेबूब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शेख अख्तर, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात, वाळूजचे निरीक्षक धनंजय येरुळे आदींच्या उपस्थित यात्रा सुरळीत पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्त म्हणाले की, यात्रेत चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी खास सूचना देण्यात आल्या आहेत. महिला भाविकांच्या दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी साध्या वेशात महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या ठिकठिकाणी नेमणुका करण्यात आल्या आहेत. परिसरात चहापान तसेच फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करताना आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांवर तसेच छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. खाजगी स्वयंसेवक तैनात करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.महिला व पुरुष भाविकांसाठी मंदिर परिसरात स्वतंत्र बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. दिंड्यांसाठी वेगळी व्यवस्था असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर पा. शिंदे यांनी दिली. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
छोटे पंढरपूर आषाढीसाठी सज्ज
By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST