वाळूज महानगर : वाळूज महानगरात वाहने जाळणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, अज्ञात माथेफिरूंनी एक दुचाकी जाळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बजाजनगरात घडली. दुचाकी जळताना स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे लोडिंग रिक्षा पेटविण्याच्या प्रयत्नात असलेले माथेफिरूपकडले जाण्याच्या भीतीने पसार झाले.वाळूज महानगरात तीन वर्षांपासून वाहने जाळणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात ठराविक कालावधीनंतर दुचाकी व चारचाकी वाहने जाळली जात असल्यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेफिरू टोळीने आतापर्यंत जवळपास दोन डझन चारचाकी, तर ५० च्यावर दुचाकी पेटवून दिल्या आहेत. यामुळे कामगार वाहनधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील स्वेदशिल्प हौसिंग सोसायटीतील प्रदीप तिवारी यांची पल्सर क्र. एम.एच.-२०,सी.जे.९२०७ ही दुचाकी पेटवून देण्यात आली. दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे रूपाली फलटणे या बाहेर आल्या असता त्यांना दुचाकी जळत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांचे पती संजय फलटणे, विजय उखळे, संजय अहिरे, गोकुळ परदेशी आदींनी तिवारी यांना झोपेतून उठवत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दुचाकीचे टायर, इंजिन जळून केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देताच फौजदार भदरगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
वाहने जाळणारी टोळी पुन्हा सक्रिय
By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST