जालना : शहरासह जिल्ह्यात रामनवमी अपूर्व व पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील नवीन व जुना जालना भागातील राम मंदिरात राम जन्मावर अधारित कीर्तनानंतर दुपारी ठिक बारा वाजता रामजन्म साजरा करण्यात आला. बाराच्या ठोक्यावर सियावर रामचंद्र की जयच्या घोषाने गुलाल व पुष्पवृष्टी करीत जन्मोत्सव साजरा झाला. जुना जालना भागातील राम मंदिरात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राम जन्मोत्सवानंतर मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. गवळी मोहल्ला भागातील राम मंदिरात विविध कार्यक्रमांसह रामनवमी साजरी करण्यात आली. बडी सडक येथील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मनोज महाराज गौड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. जिल्ह्यातही विविध राम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम पारपडले. दिवसभर कीर्तन, प्रवचन तसेच दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात रामनवमी उत्साहात!
By admin | Updated: April 4, 2017 23:26 IST