लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसामुळे बोर नदीला पूर आल्याने तालुक्यातील दहेगाव येथे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक तब्बल ५ जास ठप्प झाली होती. रविवारी दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शनिवारी (दि.१०) रात्री तालुक्यातील दहेगाव व करंजगाव परिसरात तीन तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे रविवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेदरम्यान मुंबई-नागपूर महामार्गावरील बोर नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील औरंगाबाद, वैजापूर, शिर्डी, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी काही वाहने देवगाव व खंडाळामार्गे वळवण्यात आली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोनि. अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह दहेगाव येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. अखेर पाच तासांनी बोर नदीवरील पुलावरील पाणी खाली गेल्यानंतर वाहतूक सुरू झाली.शिवना नदीला पूर; वाहतूक बंदलासूरगाव : लासूरगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील शिवना नदीला रविवारी पूर आला. लासूरगाव परिसरात रविवारी पहाटे ४ वाजता सुरू झालेला पाऊस ८.३० पर्यंत सुरू होता. परिसरात पहिल्याच पावसात शिवना नदीला पूर आल्यामुळे लासूरगाव ते लासूर स्टेशन मार्गावरील वाहतूक जवळपास ४ तास बंद झाली होती. वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागला असला तरी बळीराजाने मात्र आनंद व्यक्त केला आहे. परिसरात १ ते ११ जूनपर्यंत १४१ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर रविवारी येथे २७ मि.मी. पाऊस झाला, अशी माहिती बोकाडे यांनी दिली. येथून जवळच असलेल्या देवगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
पावसाने दाणादाण; वाहतुकीचा खोळंबा
By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST