उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसादरम्यान, अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.उस्मानाबाद शहरामध्ये रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस जवळपास अर्धा तास सुरू होता. तसेच भूम शहर व परिसरामध्ये विजेच्या कडकटाटासह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवा झाली. आरसोली, वालवड, हिवरा, हांडोग्री, वाकवडसह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. या पावसामुळे आंबा व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वंजरवाडी येथील वीज वाहक तार तुटल्याने आरसोलीसह देवंग्रा, सावरगाव, दिंडोरी, हिवरा या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ईट परिसरातही सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाऊस झाला. यावेळी आंद्रुड, ईट, निपाणी, माळेवाडी, पखरुड, चांदवड, डोकेवाडी आदी गावांतील वीजपुरवठा काही काळ खंडित होता. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात रात्री दहा ते पंधरा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच सायंकाळी सहाच्या नंतर तालुक्याच्या उर्वरित भागात वादळीवारे व विजेच्या कडकडाट रात्री उशिरापर्यंत सुरु होता. लोहारा शहर व परिसरातही रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील धानुरी येथे तब्बल पन्नास मिनिटे जोरदार पाऊस पडला. अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली. तुळजापूर परिसरातही रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST