जालना : बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे शनिवारी दुपारी येथील रेल्वेस्थानक भागात रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहा मिनिटांत पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. सुमारे एक तासाच्या थरारामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. मात्र अखेरीस हा पोलिसांचा डेमो असल्याचे खुद्द पोलिस अधीक्षकांनी सांगितल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.पोलिस नियंत्रण कक्षास दुपारी १.३० वाजेच्या सुमारास निनावी फोनद्वारे रेल्वेस्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील कदीम जालना, सदर बाजार, तालुका जालना पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, सीआरपीसी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, शीघ्र कृती दल, श्वानपथक, एटीएस पथकातील अधिकारी असा सुमारे ४०० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा अवघ्या दहा मिनिटांत रेल्वेस्थानकात दाखल झाला. दरम्यानच्या काळात काही अनुचित घटना घडू नये, म्हणून रेल्वेस्थानकात अग्निशामक दलाच्या गाड्या, रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयासह शहरातील खासगी रूग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या होत्या. पोलिसांच्या फौजफाट्याने रेल्वेस्थानकाला चोहोबाजूंनी घेरले. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेऊन श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाने तपासणी सुरू केली. स्थानकात उपस्थित प्रवाशांच्या सामानाच्या बॅगाही बॉम्बशोधक यंत्राच्या सहाय्याने तपासण्यात आल्या. प्लॅटफार्मची तपासणी करत असताना २ वाजेच्या सुमारास दादऱ्याखाली एक बेवारस कापडी पिशवी मिळून आली. बॉम्बशोधक पथकाने ही पिशवी उचलून संरक्षक भिंतीवर ठेवून तिची तपासणी केली. तेव्हा त्यात नारळाच्या शेंड्या व वायरचे तुकडे आढळून आले. तेव्हा पोलिस पथकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र त्याचवेळी नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेस स्थानकात येण्याची वेळ झाल्याने सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी अलर्ट झाले. पोलिसांचा फौजफाटा पाहून रेल्वेतून उतरलेले प्रवासीही चकित झाले. ही रेल्वे प्लॅटफार्म क्रमांक २ वर थांबली होती. त्याचवेळी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी स्थानकास भेट देऊन या प्लॅटफार्मवरून दादऱ्यामार्गे येणाऱ्या प्रवाशांना तेथेच रोखून धरले. पोलिस अधीक्षक तेथून गेल्यानंतर प्रवाशांना तेथून सोडण्यात आले. शेवटी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी हा पोलिसांचा डेमो असल्याचे सांगितल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.तासभराचा सस्पेंस...पोलिसांनी रेल्वेस्थानकात येऊन अचानक तपासणी सुरू केल्याने सुरूवातीला काय झाले, तपासणी कशामुळे अशा विविध प्रश्नांनी उपस्थित प्रवासी, नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे रेल्वेस्थानक प्रशासन आणि स्थानकात आलेल्या पोलिस पथकांनाही हा पोलिस अधीक्षकांनी घेतलेला डेमो आहे, हे माहिती नव्हते. एक तासानंतर स्वत: पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी डेमो असल्याचे सांगितले.
‘बॉम्ब’ च्या निनावी फोनमुळे रेल्वेस्थानकात खळबळ
By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST