औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेले औरंगाबादचे रेल्वेस्थानक बुधवारी पुन्हा एकदा गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसले. दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा दौरा असल्यामुळे स्थानकाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिल्या गेले. परंतु महाव्यवस्थापकांचा दौरा नांदेडपर्यंतच असल्याचे कळल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मॉडेल रेल्वेस्थानक आणि परिसर चकाचक होतो. अधिकारी येतात, पाहणी करतात असेच काहीसे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले. अधिकाऱ्याचा दौरा असल्यावर स्थानकाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिल्या गेल्याचे दिसून येते. अनेकदा अधिकाऱ्याकडून स्थानक आणि परिसराची पाहणी सुरू असतानाही स्वच्छतेचे काम सुरूच दिसून आले. अशा वेळी रेल्वेस्थानक अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसते; परंतु दुसऱ्याच दिवशी स्थानकाला अधिकारी भेट देऊन गेले हे सांगूनही खरे वाटले नसते, अशी अस्वच्छता असते. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याची पाहणी सुरू असताना स्वच्छतेचा आव आणणाऱ्यांकडून स्वच्छतेची ऐशीतैशी होत असल्याचे दिसते. दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा गुरुवारी दौरा असल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी पुन्हा एकदा रेल्वेस्थानकाचा परिसर अधिक चकाचक करण्यावर भर दिला गेला. यावेळी साफसफाईसह रंगरंगोटीचे काम करण्यावर भर दिला गेला. महाव्यवस्थापकांचा दौरा नांदेडपर्यंतच होता. औरंगाबाद स्थानकावर येण्याचा दौरा नव्हता, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्याच्या धास्तीने रेल्वेस्थानक चकाचक
By admin | Updated: August 21, 2014 00:11 IST