राजेश खराडे , बीडखरीपापेक्षा रबी हंगामाची स्थिती भयावह आहे. हंगाम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा अवधी असतानाच काढणीला सुरवात झाली आहे. उत्पादनाच्या आशेने नाही तर किमान ज्वारीच्या बाटकाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्याकरिता तरी होईल याकरिता रबीतील प्रमुख असणाऱ्या ज्वारी पिकाची काढणी सुरू झाली आहे.३ लाख ७० हजार हेक्टर ऐवढे रबीचे सरासरी क्षेत्र आहे. यंदा जवळपास ५ लाख हेक्टरवर पेरा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ३ लाख ३३ हजार ८४३ हेक्टवर पेरा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख २३ हजार ८५९ हेक्टरचा पेरा ज्वारीचा आहे गत तीन वर्षापासुन शेती पिकांच्या उत्पादनामध्ये घट होत आहे. खरीप हंगामही केवळ दीड महिन्याच्या कालावधीत उरकल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबीच्या क्षेत्रात दुपटीने वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला होता. शेतकऱ्यांकडे क्षेत्र रिकामे असूनही पावसाअभावी पेरणी धोक्यात होती. परिणामी शेतकऱ्यांना जमिनी ओल्या करून पेरा करावा लागला होता. पेरणीनंतर अवकाळी गाभण्याने पिकांना तात्पुरता का होईना आधार मिळाला होता मात्र जमिनी हलक्या प्रतिच्या असल्याने ही ओल लागलीच उडाली होती. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ठिकाणचीच पिके सुस्थितीत आहेत.सध्या ज्वारी हुर्ड्यात आली असून हे पिक परिपक्वतेच्या मार्गावर असतानाच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे कणसे लागली असली तरी ते बारिक प्रमाणात असल्याने त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. मध्यंतरीच्या गारठ्याने ज्वारी बांडाळली असून त्याचे बाटूक झाले आहे. अशा पिकाची पुर्णत: वाढ खुंटल्याने किमान चारा उपलब्ध होईल या आशेने कोरडवाहू जमिनीवरील बाटूक काढण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. वातावरणानुसार तालुकानिहाय पिकांमध्ये फरक असला तरी उत्पदनात मोठी घट होणार आहे.
यंदा निम्म्याने घटणार रबीचे उत्पादन
By admin | Updated: February 2, 2016 00:28 IST