भूम : सोसायटी निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून पिता-पुत्रास मारहाण करून जनावरांचा गोठा जाळल्याप्रकरणी परंडा तालुक्यातील रोसा येथील चौघांना तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पोकळे यांनी हे आदेश दिले.परंडा तालुक्यातील रोसा येथील बब्रूवान बाबूराव जगताप, युवराज शंकर गिरी, नीळकंठ शंकर गिरी व दत्तू निवृत्ती जगताप यांनी गणेश पाटील व व त्यांचे वडील कल्याण पाटील यांना १३ मार्च २०११ रोजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच युवराज गिरी याने घरासमोरील गोठा जाळण्याच्या उद्देशाने आदली पेटवून दिली. यामुळे गोठ्याला आग लागून यात शेतीउपयोगी अवजारे व गोठा जळून सुमारे आठ हजार रूपयांचे नुकसान केल्याची फिर्याद गणेश पाटील यांनी परंडा पोलिस ठाण्यात दिली होती. यावरुन भादंवि कलम ४३६, ४२७, ३२३, ५०४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पोकळे यांच्यासमोर झाली. यात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. बी. तांबारे (नेरे) यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. पोकळे यांनी वरील चौघांना प्रत्येकी तीन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रूपये दंड. दंड नाही भरल्यास तीन महिने सक्त मजुरी, अशी शिक्षा सुनावली. बुधवारी हा निकाल देण्यात आला. (वार्ताहर)
चौघांना सक्त मजुरी
By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST