नांदेड: नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलद गतीने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत़ त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन पाळला जाणार आहे़लोकशाही दिनानिमित्त महसूल, ग्रामविकास, नगरविकास, पाटबंधारे, सार्वजनीक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, राज्य परिवहन, सहकार, पोलिस, कृषी व जिल्हा पाणीपुरवठा समन्वय अधिकारी, जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी यांच्यासह ज्यांच्याकडे लोकशाही दिनानिमित्त प्रकरणे प्रलंबित आहेत, असे अधिकारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे उपस्थित राहतील़ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत निवेदन नोंदणी व त्यानंतर लगेचच तक्रार निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ अर्जदारांना लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावा लागेल़ येथे अर्ज देण्यापूर्वी प्रथम तालुकास्तरावरील लोकशाहीदिनी अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे़ त्याचा टोकनक्रमांक व प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीदिनी सादर करणे बंधनकारक आहे़ न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील्स, सेवाविषयक, अस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत़ लोकशाहीदिनी प्राप्त होणाऱ्या तक्रारी, अडचणी एकत्रितरित्या समजावून घेवून त्या शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
नागरिकांच्या समस्यांचा जलद निपटारा
By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST