औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या असून, मराठवाड्यातील सर्व जुन्या पुलांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. विभागातील ११ पूल जुने असले तरी त्यांची ‘कॅरिंग कपॅसिटी’ चांगली आहे. त्या सर्व पुलांच्या आॅडिटबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पुलांवरील वाहतुकीचे नियमित इन्स्पेक्शन होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातून साधारणत: ३०० कि़ मी. गोदावरीचे पात्र जाते. हे पात्र जोडण्यासाठी बांधण्यात आलेले पूल बांधकाम विभागाने निर्माण केले आहेत. नाशिकमधून गोदावरी, काश्यपी, गौतमी या नद्यांचा उगम असल्यामुळे गंगापूर धरणाखालील गोदापात्राला दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आला आहे. त्या पुराचे पाणी गोदावरीतील पात्रातून नांदूर-मधमेश्वरमार्गे जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले आहे. जायकवाडीखालील गोदावरी पात्राच्या अंतरात पावसाचा जोर नसल्यामुळे पुलांचे नुकसान होईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. कायगाव, शहागड येथील जुन्या पुलांचे साधारणत: १० वर्षांपूर्वी बांधकाम झाले आहे.पैठणनजीकच्या आपेगाव येथील पूल मागेच खचला आहे. त्या पुलाला पर्याय असल्यामुळे तो अजून दुरुस्त झालेला नाही. विभागातील बहुतांश जिल्हा मार्ग खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २२०० कोटींच्या आसपास त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लागतील, असा अंदाज आहे.मुख्य अभियंता म्हणाले....महाडमधील दुर्घटना गंभीर आहे. तो पूल १०० वर्षे जुना असल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात काही जुने पूल आहेत. परंतु सध्या त्या पुलांना कुठलाही धोका नाही. विभागामार्फत जिल्हा पुलांचे इन्स्पेक्शन नियमित केले जाते. तरीही विभागातील सर्व यंत्रणेला जिल्ह्यांतील महत्त्वांच्या पुलांबाबत वाहतूक आणि सद्य:स्थिती काय आहे, याची माहिती तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी पुलांना कुठलाही धोका नाही. कोकणात सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाचे पाणी वेगाने येते. त्यामुळे त्याचा फटका रस्ते आणि पुलांना होता. तशी परिस्थिती मराठवाड्यात नाही. तसेच पावसाचे प्रमाणही संथ आहे, असे मुख्य अभियंता सुरकटवार यांनी नमूद केले.
जुन्या पुलांबाबत ‘पीडब्ल्यूडी’ अलर्ट
By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST